पुणे -आज पेट्रोल पे चर्चा हो रही है, डिझेल पे चर्चा हो रही है, पर्यायी इंधनावर चर्चा होत आहे हे म्हटले तर खूप मोठे पाऊल आहे. आपण चर्चा करून थांबत नाही तर एक-एक पाऊल पुढे टाकत आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुण्यातील पर्यायी इंधन परिषदेचे (Pune Alternative Fuel Council) कौतुक केले. आपण सर्वांनी पर्यावरणाचा विचार करत पर्यायी इंधनाचा वापर केला पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
पर्यायी इंधन परिषदेच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईनच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांच्यासह उद्योजक, गुंतवणूकदार सहभागी झाले होते.
राज्य पर्यायी इंधनासाठी एक पाऊल पुढे टाकते - राज्य पर्यायी इंधनासाठी एकएक पाऊल पुढे टाकत आहोत, एक दोन शतके तर निश्चित झाले असतील की, आपण पेट्रोल आणि डिझेल वापरत आहोत. एखाद्या गोष्टीचा शोध लावणे आणि त्याचा वापर सुरू करणे, त्याला 100 ते 150 वर्षांनी पर्याय शोधणे, हे साधे काम नाही. पण काहीवेळेला आपण विकास पाहिजे.त्या विकासाला गती पाहिजे, ही नेमकी गती, प्रगतीची आहे की अधोगतीची आहे हे जर थांबून विचार करण्याची वेळ येते, तेव्हा थांबून विचार करण्याची गरज असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्याला शाश्वत विकास पाहिजे -काही हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर असे वाटत होते की, जे डायनॉसोर होते त्यांना वाटायचे की आपल्याशिवाय कोणीच जगू शकत नाही. सर्वात ताकदवान आपणच आहोत, त्यांना जसे वाटायला लागले की, आपण ताकदवान आहोत, पृथ्वी जशी पुढे जाईल तसे आपण ठरवू त्या मिनिटाला त्यांचा नाश झाला. त्यामुळे आपण मानवता म्हणून ठरवले पाहिजे की, आपण कोणत्या दिशेने चाललोय, मार्ग कोणता निवडला आहे, त्यामुळे आपल्याला शाश्वत विकास पाहिजे की, भकास पाहीजे याबाबतचा विचार आपण केला पाहिजे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
पर्यावरणाचा विचार सर्वांनी केला पाहिजे -पुणे शहर ऑटो मोटिव्हमध्ये देशात कायम पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. आता त्यात एक भर पडली आहे ती म्हणजे पर्यायी इंधन परिषदेचे उद्घाटन झाले आहे. इलेक्ट्रिक बाइक, दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. मागील काही वर्षात इलेक्ट्रिक बाइकला नागरिकांनी खरेदी करण्यास पसंती दिल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. ही चांगली बाब असून, पर्यावरणाचा विचार सर्वांनी केला पाहिजे, असे देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.