पुणे -येथील बालेवाडी स्टेडियमवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली. 'राजकारणात आणि पोलिसांमध्ये फरक असतो. राजकारणात 'कही पे निगाहे कही पे निशाणा' असं असतं. मात्र, तुमचा ज्या ठिकाणी निशाणा आहे तो तिथेच असतो. तुमचा नेम कधी चुकत नाही', अशी फटकेबाजी ठाकरे यांनी केली. 'तुमच्यात जिंकण्याची जिद्द हवी, तुमचा विजय निश्चित आहे', असेही मुख्यमंत्री म्हणाले.
१३ वी अखिल भारतीय पोलीस नेमबाजी क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही वाचा -बांगलादेशच्या ५ प्रशिक्षकांनी पाकिस्तानात जाण्यास दिला नकार
१३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रीडा) अजिंक्यपद स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये देशातल्या साडेपाचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. 'आपण विविध राज्यातून आलेले आहात. मला वाटतं की, हिंदुस्थानातील प्रत्येक पोलिसाचा निशाणा योग्य ठिकाणी लागला पाहिजे. पोलिसांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती आम्ही घेऊ', असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला नीलम गोऱ्हे, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम आदी मान्यवर उपस्थित होते.