पुणे - गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दही हंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, मोहरम तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
हेही वाचा -उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख पुणे संजय मोरे यांना अटक
गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल -पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाची १२५ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव समाजजागृतीच्या उद्देशाने सुरू केले. ही परंपरा मंडळांनी सुरू ठेवावी. गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो. त्यामुळे, आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे, यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दही हंडी आदी सण उत्साहाने, धुमधडाक्यात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, कोविडमध्ये गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीने काम केले आहे. आगामी गणेशोत्सवातही उत्कृष्ट काम करावे. कोरोनाबाबत चांगली जनजागृती करावी. गोविंदा उत्सवही चांगल्याप्रकारे साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.