पुणे- गड-किल्ल्यांसंदर्भातील बातमी अतिशय चुकीची आहे. हिंदवी स्वराज्यातील गड किल्ल्यांना नखही लावू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासासंबंधीत कोणत्याही चुकीच्या गोष्टींना कधीही परवानगी मिळणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
गड किल्ल्यांना नखही लागू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
गडकिल्ल्यांसंदर्भातील निर्णयाने आजचा दिवस गाजला. मात्र त्यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहेत. त्यामुळे या वादाला आता तरी ब्रेक लागला आहे.
हेही वाचा - किल्ले लग्न, समारंभांसाठी भाड्याने देण्याच्या बातमीवर पर्यटन विभागाचा खुलासा
संरक्षित किल्ल्यांचा आमच्या सरकारने विकास केला आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी लक्ष घालून काम केलेले आहे. आम्हाला इतिहास जतन करायचा आहे. जो काही निर्णय झाला, तो ऐतिहासिक किल्ल्यांव्यतिरिक्त जे किल्ले आहेत, ज्यांचा इतिहास अस्तित्वात नाही, ज्यांच्या केवळ चार भिंती आहेत, अशा ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का? असा निर्णय होता. त्यामुळे तिथे लग्न करायचे आहेत किंवा समारंभ करायचे, त्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे हिंदवी स्वराजाच्या किल्ल्यांना नखभरही हात लावू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.