पुणे -नातेवाईकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधुन मला का काढून टाकले असा जाब विचारला, म्हणून झालेल्या वादावादीचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील मगरपट्टा सिटीमध्ये २९ फ्रेब्रुरीला रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. २५ वर्षीय महिलेने या प्रकरणी हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने हाणामारी, ६० वर्षीय नातेवाईकासह तिघांवर विनयभंगाचा गुन्हा - Pune crime news
पुण्यातील मगरपट्टा भागात नातेवाईकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधुन काढून टाकल्यानंतर जाब विचारला असता हणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे
![व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने हाणामारी, ६० वर्षीय नातेवाईकासह तिघांवर विनयभंगाचा गुन्हा clash occurred in pune after one person removed WhatsApp group](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6272370-835-6272370-1583170543352.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी हे नातेवाईक आहेत. त्यांच्या नातेवाईकांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे़. त्यामधून एकाला काढून टाकायला लावले, याचा जाब विचारण्यासाठी ही महिला, तिचे पती, सासू सासरे असे सर्व मिळून शनिवारी रात्री मगरपट्टा सिटी येथील आरोपीच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांचा वादावादी झाली. यावेळी आरोपी व त्यांच्या नातेवाईकांनी फिर्यादींना अश्लील शिवीगाळ करुन धमकी दिली. फिर्यादींच्या अंगावर जाऊन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी तिघाविरुद्ध विनयभंग करणे, दुखापत करणे अशा कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकासह एका तरुणाला ताब्यात घेतले आहे़.
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एखाद्याला काढून टाकणे अथवा सामावून घेणे, हा आता प्रतिष्ठेचा मुद्दा होऊ लागला आहे़. किरकोळ वाटणाऱ्या अशा घटना किती गंभीर होऊ शकतात, हेच यावरुन दिसून येत आहे़. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन एखाद्याला काढून टाकताना संबंधित दुखावला जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे़. हडपसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.