पुणे -राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पुण्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेची राज्यस्तरीय कार्यशाळा सुरू होती. या कार्यशाळेत सदाभाऊ खोत यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. यावेळी अरे घोषणा काय देता, हिम्मत असेल तर मैदान ठरवा, सदाभाऊ एकटा यायला तयार आहे, अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आव्हान दिले.
सदाभाऊंचा स्वाभिमानीवर निशाणा ; म्हणाले, हिम्मत असेल तर मैदान ठरवा, एकटा यायला तयार
पुण्यातील प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सदाभाऊ खोत यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली.
कार्यक्रम सुरू असताना घोषणा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे आवश्यक होते. त्यासाठीच आजची कार्यशाळा होती. शांतपणे त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले असते तर ते दिल्ली दरबारी गेले असते. मात्र, घोषणा देणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल याचीच हवा त्यांच्या डोक्यात शिरलेली आहे, असे खोत म्हणाले.
खोत यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि उर्वरित कार्यक्रम सुरळीत पार पडला. या कार्यक्रमानंतर सदाभाऊ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहात, हे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील जनतेने तुम्हाला दाखवून दिले. तुमची मस्ती एक वेळा आम्ही जिरवली आहे. घोषणाबाजी करुन जर आम्हाला कोणी रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना रोखायचे कसे, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. तुमची ही मस्ती सदाभाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते चालू देणार नाहीत, असा इशारा त्यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना दिला.