महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार; पंतप्रधान मोदी साधणार ऑनलाईन संवाद - पुणे ताज्या बातम्या

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. उद्या, शुक्रवारी पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

Civil felicitation of Babasaheb Purandare in pune
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार; पंतप्रधान मोदी साधणार ऑनलाईन संवाद

By

Published : Aug 12, 2021, 5:56 PM IST

पुणे -शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. उद्या, शुक्रवारी (ता. १३) पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या निमित्ताने बाबासाहेबांनी ध्यास घेतलेला 'शिवसृष्टी' प्रकल्प करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे 'महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान'चे विश्वस्त जगदीश कदम व 'शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचेही त्या म्हणाले.

दिग्गजांची राहणार उपस्थिती -

जगदीश कदम म्हणाले, 'बाबासाहेब पुरंदरे १३ ऑगस्ट २०२१ रोजी तिथीनुसार शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचा नागरी सत्कार, कोविड मर्यादांचे पालन करीत मोजक्या नामवंतांच्या उपस्थितीत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विख्यात क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर या विशेष कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होत शिवशाहीरांचे अभीष्टचिंतन करणार आहेत. सुमित्रा महाजन, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते नागरी सत्कार करण्यात येईल. सत्कार समारोह समितीचे सदस्य खासदार विनय सहस्रबुद्धे या गौरव समारंभात सहभागी असतील. १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवसृष्टीला भेट देणार आहेत.

फेसबुक होणार प्रक्षेपण -

बाबासाहेबांचा शंभरीनिमित्त सत्कार करीत असताना शिवसृष्टीचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. या संकल्पाला या कार्यक्रमामुळे बळ लाभेल, असा विश्वास सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केला. बाबासाहेबांच्या गौरवासाठी गठित करण्यात आलेल्या सत्कार समारोह समितीच्यावतीने पुढील वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहितीही कदम यांनी दिली. कोरोनातील सर्व नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम होत असल्याने प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश आहे, नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम Shivsrushti Puneofficial या अधिकृत फेसबुक पेजवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे, अशी माहितीही कदम यांनी दिली.

समारोह समितीत दिग्गजांचा समावेश -

समारोह समितीत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर), भारतरत्न सचिन तेंडुलकर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, विख्यात गायक शंकर महादेवन, ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, प्रमोद चौधरी, उद्योजक प्रतापराव पवार, क्रेडाई- पुणेचे अध्यक्ष अनिल फरांदे यांच्यासह अनेक नामवंतांचा असल्याचे सुमित्राताई महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा -पेटा हटाव बैल बचाव: बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details