पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील पे अँड पार्कमुळे नागरिकांना भुर्दंड बसणार आहे. आधीच कोरोनामुळे नागरिक त्रस्त आहेत त्यात शहरातील पे अँड पार्कमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. यावर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पे अँड पार्क धोरण राबवल जात असल्याचे म्हटले आहे. तर मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी मात्र या धोरणाला विरोध दर्शविला आहे.
27 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या
पिंपरी-चिंचवड शहरात 27 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असून वाहन पार्क करण्यासाठी जागेचा अभाव आहे, हे प्रत्येक ठिकाणी जाणवते. त्यामुळेच पिंपरी मार्केटमध्ये अनेकदा वाहनचालकांना दुचाकी पार्क करताना अनेक अडचणी येतात. चारचाकी वाहन घेऊन चालक तिथे जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी महानगरपालिका पे अँड पार्क धोरण राबवत असून तासाला वाहनचालकाला भुर्दंड भरावा लागणार आहे.