पुणे : बहिण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन (Rakhi Festival Activity) गुरुवारी (ता. ११) साजरा होणार आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण-उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले. रक्षाबंधनही निर्बंधात साजरा करावा लागला. पण यंदा निर्बंध मुक्त झाले असल्याने आणि रक्षाबंधन 10 दिवसांवर येऊन ठेपला असल्याने, पुण्यातील बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. देशभरातून विविध ठिकाणाहून राख्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना (for soldiers On Rakhi Festival) पाठविण्यात येतात. 'आम्ही पुणेकर' या संस्थेच्यावतीने (Aamhi Punekar Trust) जम्मू आणि कश्मिरमधील सैनिकांकरीता दिव्यांगांनी बनविलेल्या राख्या आणि चॉकलेट राख्या हे पाठविण्यात आल्या आहे.
यावेळी राख्यांचे पूजन, सोमवार पेठ येथे झालेल्या कार्यक्रमात; दृष्टीहिन मुले व निवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विद्या गायकवाड, प्रशांत टिळेकर,अर्पिता चंडेल, हेमंत जाधव, डॉ.स्वप्नील शेठ, अखिल झांजले, संतोष फुटक, सुभाष सुर्वे, विक्रम मूर्ती, रामदास लढे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला मूर्तीज् प्रोडक्टचे देखील सहकार्य लाभले.
सिमेवरील सैनिकांसाठी त्यांच्या घरुन राखी येते, ती पोस्टाने किंवा प्रत्यक्षपणे आली, तरी हा त्यांच्यासाठी भावनास्पर्शी प्रसंग असतो. त्यावेळी सैनिक आणि भारतवासियांचे एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त होते. आपल्या मागे आपला संपूर्ण देश उभा आहे, ही भावना सैनिकांपर्यंत राखीच्या माध्यमातून पोहोचणे गरजेचे आहे, असे मत यावेळी निवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी यांनी व्यक्त केले.