पुणे- राज्यात शिवसेनेने भाजपशी असलेली अनेक वर्षाची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सत्तांतरानंतर प्रथमच भेट होणार आहे. पुण्यात आजपासून सुरू होत असलेल्या देशातील पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत.
हेही वाचा -नीरव मोदीच्या नाड्या आवळल्या; फरार आर्थिक गुन्हेगार घोषित
पुणे विमानतळावर आज रात्री दहा वाजता पंतप्रधानांचे आगमन होणार असून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये कटुता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी बंध कायम ठेवत मोदी हे मोठे भाऊ असल्याचे वक्तव्य केले होते.
दुसरीकडे केंद्रातील एनडीएमधून देखील शिवसेना बाहेर पडल्याने ताणलेल्या या वातावरणात आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. अर्थात ही भेट अल्पकाळासाठी असेल. पंतप्रधानांचे पुणे विमानतळावर आगमन होताच मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करतील आणि त्यानंतर लगेचच ते पुन्हा मुंबईला परत जाणार आहेत.