पुणे - गर्ल ऑन 'विंगचेअर' ‘मोटीवेशनल स्पीकर' म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील दीक्षा दिंडे हिला नुकतच ब्रिटिश सरकारची ( British Government Scholarship ) प्रतिष्ठित समजली जाणारी चेवनिंग स्कॉलरशिपसाठी( Chevening Scholarship ) निवड झाली आहे. भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील ज्या 75 मुलांची या स्कॉलरशिपसाठी निवड झाली. ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित समजली जाणारी चेवनिंग स्कॉलरशिपसाठी ही अशा मुलांना मिळते ज्यांना उच्च शिक्षणासाठी ( ( Higher education Scholarship ) परदेशात जायचे आहे. ज्या मुलांची आर्थिक परीस्थिती चांगली नाही अशा मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाते. यंदाच्या वर्षी 160 देशांमधून 68 हजार मुलांनी या स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता. त्यात दीड हजार मुलांची निवड केली जाते. त्यातील दीक्षा दिंडे यांची निवड करण्यात आली आहे.
कोण आहे दीक्षा दिंडे -पुण्यातील कात्रज येथील सोनवणे चाळीत दहा बाय बाराच्या घरात राहणारी दीक्षा जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले आहे. तीला ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या आहे. मात्र, अशी परीस्थिती असतांना देखील तीची जिद्द, हुशारी तसेच तिच्या स्वप्नाुला कोणी रोखू शकले नाही. अपंगत्वामुळे खासगी शाळेने प्रवेश नाकारलेल्या दीक्षा दिंडे हिला आज जगभरातल्या महत्त्वाच्या चर्चासत्रांसाठी सन्मानाने ‘मोटीवेशनल स्पीकर' म्हणून बोलावले जाते. व्हील चेअरशिवाय फिरता न येणारी दीक्षा आज उच्च शिक्षण, नोकरी तसेच तिच्या सामाजिक कामामुळे अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.
मुलांना यशाच्या मार्गाने धडे -पुण्यातील वस्तीतील मुलाचा शिक्षण, अपंग मुलांच्या समस्या, मासिक पाळी या सगळ्या विषयांवर काम करणाऱ्या संस्थेत दीक्षाने काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 2016 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची 'ग्लोबल युथ अँबेसिटर' म्हणून तिची निवड झाली. तसेच शाश्वत विकास', ‘तरुणांचे नेतृत्व', 'दिव्यांगांचे अधिकार' या विषयांवरील चर्चासत्रांसाठी ती आतापर्यंत मलेशिया, साऊथ कोरिया, इजिप्तमध्ये जाऊन आली आहे. दिव्यांगांना कोणत्या सोयी-सुविधा आवश्यक आहेत. त्यासाठी शहर नियोजन करताना काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर तिने मलेशियातील चर्चासत्रात सादरीकरण केले होते. त्यानंतर तिने तसेच तिच्या सहकाऱ्यांनी मिळून पुण्याच्या झेड ब्रिजच्या खाली शाळा सुरु केली आहे. सिग्लनवर भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या प्रश्नांवर त्यांच्या समस्यांवर काम करण्याचा निर्धार केला. स्वत: व्हीलचेअरवर असताना सगळ्या मुलांना यशाच्या मार्गाने चालण्याचे धडे ति देत आहे.