पुणे -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील थेट संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे बोलले होते. सामनातून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. ही भाषा अग्रलेखात कशी वापरण्यात आली, असा सवाल त्यांनी केला होता. दरम्यान त्यांनी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहले आहे. आम्ही सामना वाचतो, यासाठी की आमच्यावर काही टिका केली आहे का? बाकी आमच्यावरती टिका करण्याशिवाय सामनामध्ये काही नसते. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहीलंय, पत्रात एवढंच म्हटलंय, की माझ्यावर अग्रलेखात जी भाषा वापरण्यात आली ती शोभनीय नाही, तुम्ही संपादक आहात जर ती भाषा तुम्हाला शोभनीय असेल किंवा सहमत असेल तर तुम्हाला शुभेच्छा! माझं काही म्हणणं नाही. मी फक्त एवढंच पत्रात लिहिलं असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र काय लिहिलंय पत्रात-नमस्कार सौ. रश्मी वहिनी !आज आपणास पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी जी, भाजपाचे राष्ट्रीय नेते तसेच भाजपा महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा ! वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात, वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा यासर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल.आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करू इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !
पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेचा ‘सामना’-राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेचा ‘सामना’ रंगताना दिसत आहे. भाजपाकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेच्या नेत्यांसह सामनातूनही प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं दिसत आहे. सामनातील लिखाणाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप नोंदवला असून, त्याबद्दल संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र ही लिहिलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनीही टिका केली. त्यांनतर आता परत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेत सामना पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील-
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली होती. त्यावर चंद्रकांत पाटील थेट संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे बोलले होते. सामनातून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. ही भाषा अग्रलेखात कशी वापरण्यात आली, असा सवाल त्यांनी केला आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर कराव, ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांचीही होती. ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते, त्यावेळी बाळासाहेबांनी ही मागणी केल्याचा टोला पाटील यांनी लगावला आहे.
हेही वाचा-भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला सरकारची मंजूरी