पुणे -मागील काही दिवसांपासून दांडी मारलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही भागात 16 ते 19 ऑगस्टदरम्यान मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे येथील कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता -
16 ते 19 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तर वीजेच्या कडाटासह जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.