पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरडे हवामान आहे त्यामुळे काही प्रमाणात थंडीची चाहूल जाणवू लागली होती. मात्र आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस पडू शकतो, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
या भागात सतर्कतेचा इशारा -
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील या प्रदेशात पोषक हवामान तयार होत असून आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी वातावरणाचा अंदाज घेऊन समुद्रात जाण्याचे आवाहन केले आहे.
चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण -
२५ ऑक्टोबरला संपूर्ण देशातून यंदाचा मान्सूनने माघार घेतली असल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले होते. या कालावधीत एक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे. हा कमी दाबाचा पट्टा तीव्रतेने पश्चिम दिशेने सरकला असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाच्या शक्यतेची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.