पुणे -कोविड काळात शाळा नाही, खेळ नाही, शाळा बंद असल्यामुळे मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र त्यामुळे मुले व्हर्चुअल जगात गुंतत चालली आहेत. यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी, पुण्यातील जय गणेश व्यासपीठांतर्गत असलेल्या गणेश मंडळांनी एकत्र येत 'चला मुलांनो, पुस्तक वाचू या' हा उपक्रम हाती घेतला आहे.
अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रंगावलीभोवती मांडलेल्या ५ हजार पुस्तकांच्या पूजनाने या उपक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अॅड. मिहिर प्रभुदेसाई, पराग ठाकूर, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे, नू.म.वि. शाळेच्या मुख्याध्यापिका सोनावणे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, पीयुष शाह आदी उपस्थित होते. शहराच्या विविध भागांतील मंडळे घरोघरी जाऊन मुलांना ही पुस्तके विनामूल्य देणार आहेत.
16 गणेश मंडळांनी मिळून सुरू केला उपक्रम
मोबाईल आणि टिव्हीपेक्षा मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शहरातील विविध भागातील गणेश मंडळानी पुढाकार घेतला आहे. यात मुलांना आवडतील अशा ज्ञान व मनोरंजनात्मक जादूच्या गोष्टी, साहस कथा, शौर्य कथा, राष्ट्रभक्त, क्रांतिकारकांच्या गोष्टींबरोबरच अभ्यासपूरक प्रकल्पांसाठीच्या पुस्तकांचाही समावेश आहे. ज्या मुला-मुलींना पुस्तके हवी आहेत, त्यांनी ९८२३०२३०२१ या क्रमांकावर फोन न करता केवळ वॉटस् अॅपद्वारे संदेश पाठवून आपले नाव, पत्ता इ. नोंदवायचे आहे. त्यामाहितीद्वारे संबंधित भागातील मंडळाचे कार्यकर्ते मुलांना घरोघरी जाऊन भेट स्वरुपात पुस्तके देणार आहेत. अशी माहिती यावेळी साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा यांनी दिली.