मुंबई -वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या काळात गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली असून रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेकडून मुंबई विभागातील सात स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर पाच पटीने वाढविण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा फलाट तिकिटांचे दर 50 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आले आहेत. रुग्ण, दिव्यांग, गर्भवती महिला यांची ने-आण करणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
मुंबईत 7 रेल्वे स्थानकांवर निर्णय लागू
कोरोच्या पार्श्वभूमीवर म्हणून गेल्या वर्षी रेल्वे स्थानकावर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि खबरदारी म्हणून भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पाच पटीने वाढवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर लॉकडाऊननंतर प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद केले होते. मात्र, १५ मार्च २०२१पासून मुंबई उपनगरातील महत्त्वाच्या 7 रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म रेल्वे तिकीट देण्यात निर्णय घेतला होता. या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 वरून 50 रुपये करण्यात आले होते. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकाचा समावेश आहे. त्यामुळे या स्थानकावर आता वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी त्यांच्या नातेवाईक रेल्वे स्थानकांवर येणे शक्य झाले होते.