पुणे- सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू व गांधी कुटुंबीयाबाबत चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती.
हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न?
पायल रोहतगी हिने पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, त्यांचे कुटुंबीय आणि काँग्रेस परिवार याविषयी खोटा आणि बदनामीकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे. सुरुवातीला सायबर पोलीस ठाण्यात हा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिथून तो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.