पुणे - पुण्यातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे चंपा खड्डा, महापौर खड्डा, खासदार खड्डा, फडणवीस-चंपा खड्डा, असे नामकरण करण्यात आले. टिळक रोडवर मोर्चा निघणार असल्याचे कळताच याचा धसका घेत महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले. पुण्यात भाजपाचे खासदार, आमदार असताना तसेच महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता असताना शहरात सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या खड्ड्यांना भाजपा नेत्यांची नावे देत शिवसेनेने हे अनोखे आंदोलन केले आहे.
पुण्यात खड्ड्यांच्या प्रश्नावरुन शिवसेना आक्रमक 'भाजपाची लाज पुण्यात पडलेल्या खड्ड्यांनी काढली'
शहराचा विकास केल्याची फ्लेक्सबाजी करून मिरविणाऱ्या आणि 'स्मार्ट सिटी'ची स्वप्ने दाखविणाऱ्या सत्ताधारी भाजपाची लाज पुण्यात पडलेल्या खड्ड्यांनी काढली. अनेक रस्त्यांवर खड्डे कायम असून काही ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीने पॅच वर्क करण्यात आले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर खडी उखडून आली असून त्यावरून गाडी घसरून पडण्याचा धोकाही निर्माण झाला आहे, असा आरोप शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी केला आहे.
'ठेकेदार हे महापालिकेचे जावई'
पुण्याला स्मार्ट बनविण्याची स्वप्ने दाखविणारे कारभारी साधे रस्ते नीट तयार करू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. ठेकेदार हे महापालिकेचे जावई असल्याच्या थाटात वावरत आहेत. त्यांच्यावर सत्ताधारी कोणताही वचक निर्माण करू शकले नाहीत. ठेकेदार सत्ताधाऱ्यांना विचारत नाहीत. किंमत देत नाहीत. मनमानी कारभार करतात. त्याचाच फटका पुणेकरांना बसतो आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
'न खाऊंगा ना खाने दूंगा' पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भूमिकेचा विसर'
पाच वर्षे संपत आली तरी भाजपाला पुणेकरांना साध्या सुविधा देखील देता आलेल्या नाहीत. ठेकेदारांना वाचविण्यासाठी आता रस्त्यांची कामे करण्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहेत. याचा अर्थ असा की, रस्ते करताना केलेला खर्च वाया, रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई काहीच नाही आणि रस्ते दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी. प्रत्येक वेळी स्वतःचे खिसे भरण्याचे विक्रम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना 'न खाऊंगा ना खाने दूंगा' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचा विसर पडलेला दिसतो आहे, अशी टीकाही यावेळी मोरे यांनी केली आहे.
हेही वाचा -..म्हणून नितीन गडकरींचे नाव मृत्यूपत्रात दिले, माजी मंत्री दत्ता मेघेंनी केला खुलासा