पुणे- पोलीस आयुक्तालय आणि बंडगार्डन पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एसबीआय बँकेसमोर फुटपाथवर उभ्या असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश हरिदास कानाबार (वय 63) असे खून झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार मयत राजेश कानाबार यांचे जागेवरून वाद होते. या वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजेश हे पोलीस आयुक्तालयकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर आज दुपारच्या सुमारास उभे होते. यावेळी त्यांच्याजवळ दुचाकीवरून दोन व्यक्ती आले. त्यातील एकाने जवळून त्यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या, बंडगार्डन पोलीस ठाण्याजवळ घटना - बिल्डर खून न्यूज
राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. जागेच्या वादातून बिल्डरचा गोळ्या झाडून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
खुनाचे घटनास्थळ
घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान पोलीस आयुक्तालयात पासून हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Last Updated : Oct 5, 2020, 8:03 PM IST