पुणे- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांना 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या आरोपींकडून बेनामी जमीन विकत घेण्याच्या आरोपाखाली ईडीने यांना अटक केली आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतरही सरकार त्यांच्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा घेत नाही. याचा अर्थ असा की 1993 साली दाऊदच्या नेतृत्वात झालेल्या सगळ्या गुन्हेगारांना सरकार समर्थन करत आहे. त्यावेळचे बॉम्बस्फोट कसे बरोबर होते. त्यांना मदत करणारे नवाब मलिक हे कसे बरोबर होते, असा दाखवण्याचा हा प्रयत्न सुरू असून भारतीय जनता पक्ष हे सहन करणार नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी व्यक्त केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. आम्ही मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण, त्यांनी दिला नाही. यापूर्वी संजय राठोड व अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. मग नवाब मलिक यांच्याकडून राजीनामा का घेतला जात नाही, असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित करत आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे.