पुणे - महाराष्ट्रात मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि जामिनावर सुटका, तसेच सेना भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या राड्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर नारायण राणे यांच्यावर झालेल्या कारवाईवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मंगळवारी दिवसभर झालेला राजकीय खेळ पूर्णपणे सूडबुद्धीने झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने मांडलेला कुठलाही मुद्दा न्यायालयात टिकला नाही. त्यामुळेच न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन दिला. या घटनेत हे स्पष्ट झाले की सत्याचा विजय झाला. कायद्याच्या कचाट्यात अडकवणारी या सरकारची एकही गोष्ट कोर्टात टिकली नाही. कोर्टात यांना थपडा खायला लागल्या. न्यायालयाने त्यांना कायदा हातात घेऊन दुरुपयोग केला असल्याचे आतापर्यंत सांगितले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
रात गई बात गई, तो प्रकार अमानवीय-
भारतीय जनता पार्टी कधीही मनामध्ये खुन्नस ठेवून काम करत नाही. रात गई बात गई, त्यांना आता जामीन मिळाला आहे. परंतु त्यांच्या सोबत मंगळवारी जो काही प्रकार झाला तो खूप अमानवी होता. जेवताना त्यांच्या हातातील ताट काढून घेण्यात आले. त्यांची तब्येत खूप बिघडली. त्यांची शुगर जामीन झाल्यानंतर पाचशे होती. त्यांचा बीपी वाढला होता. अटक करत असतानाच त्यांना डॉक्टरांनी हे सर्व सांगितले होते. परंतु त्यांना कुठलीही वैद्यकीय ट्रीटमेंट दिली नाही. त्यामुळे नारायण राणे एखादा दिवस विश्रांती घेतील आणि त्यांची तब्येत पुन्हा नॉर्मल झाल्यानंतर बहुदा ते जनआशीर्वाद यात्रेसा सुरुवात करतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.