पुणे - पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकावरच उपोषण करण्याची वेळ आली आहे. संबंधित नगरसेवकाच्या प्रभागात पाणी टंचाईची समस्या आहे. त्यामुळे भाजपा नगरसेवक तुषार कामठे बेमुदत उपोषनाला बसले असून याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात एक आणि शहरात एक अशी दुटप्पी भूमिका पक्षामध्ये निर्माण झाली आहे. मात्र नागरिक व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
पिंपरी-चिंचवड : सत्ताधारी भाजप नगरसेवकावरच उपोषणाची वेळ; राष्ट्रवादीचा पाठिंबा - BJP nagarasevak
भाजप नगरसेवकाच्या प्रभागात पाणी टंचाईची समस्या आहे. त्यामुळे भाजपा नगरसेवक तुषार कामठे बेमुदत उपोषनाला बसले असून याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला आहे.
![पिंपरी-चिंचवड : सत्ताधारी भाजप नगरसेवकावरच उपोषणाची वेळ; राष्ट्रवादीचा पाठिंबा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4535002-thumbnail-3x2-pune.jpg)
नगरसेवक तुषार कामठे म्हणाले की, सत्तेचा विषय नाही. येथील प्रशासन झोपलेले आहे. त्यांच्या विरोधात हे उपोषण आहे. जेव्हा निवडून आलो, तेव्हापासून पाणीटंचाई च्या संदर्भात १९ निवेदने दिलीत. शिवाय तीन आंदोलनही महानगर पालिकेत केली आहेत. महासभेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र या प्रशासनाला जाग येत नाही. सामान्य नागरिकांना पाणी मिळत नसल्याने उपोषण करण्याची वेळ माझ्यावर आली असल्याचे नगरसेवक तुषार कामठे म्हणाले. जोपर्यंत सामान्य नागरिकांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण करणार आहे असल्याची ठाम भूमिका कामठे यांनी घेतली आहे. दरम्यान, भाजप नगरसेवकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. नागरिकांचे हाल बघवत नसल्याने त्यांनी पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सांगितले. माझ्याबद्दल त्यांना प्रेम आहे, येथे पक्ष नाही. केवळ सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळावे ही भूमिका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आहे. भाजपच्या उपमहापौर आणि अन्य कार्यकर्त्यांचाही पाठिंबा असल्याचे कामठे यांनी स्पष्ट केले. मात्र, महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकाला उपोषणाला बसण्याची वेळ आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.