पुणे - कथितरित्या पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झाल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित महिलेला शिवीगाळ करणारे व्यक्ती हे कथितरित्या भाजप आमदार सुनील कांबळे असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे.
महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ -
या कथित ऑडियो क्लिपमधील महिला अधिकारी पुणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागात कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात एक व्यक्ती मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क करतो. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेले व्यक्ती या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ही कथित ऑडियो क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमधील शिवीगाळ करणारे व्यक्ती हे कथितरित्या भाजप आमदार सुनील कांबळे असल्याचा आरोप केला जात आहे. या कथित मोबाईल रेकॉर्डिंगचे संभाषण आता व्हायरल झाले असून ते काही महिन्यांपूर्वीचे असल्याचे सांगितले जात आहे.