पुणे - मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील प्रशासन जरी कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असले, तरीही शहरातील वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुण्यातील भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहेत.
हेही वाचा -अंतिम वर्ष परीक्षेच्या निर्णयाविरोधात युवासेना सर्वोच्च न्यायालयात; रीट याचिका केली दाखल
महाराष्ट्रात कोरोनाची पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण दररोज मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्याप्रमाणात आरोग्याच्या सुविधा मात्र नाहीत. लॉकडाऊनच्या काळात आरोग्याच्या सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. त्या तयार झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची नामुष्की आली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांना आवश्यक ते उपचार मिळत नाहीत. बेड्स उपलब्ध नाहीत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने पुण्यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.