पुणे - कुठल्याही शहारत लोकांचे जे महिन्याभराचे बजेट असते त्यातील महत्त्वाचा भाग हा वाहतूक असतो. घरातील प्रत्येक जण हा कामानिमित्त बाहेर पडत असतो. सगळ्यांना बसेसला पैसे लागतात. बरेच वेळा सुविधा चांगल्या नसले तर घरातील सदस्य हे अन्य वाहतुकीचा पर्याय निवडतात. बसेस वेळेवर आल्या आणि स्वस्त प्रवास झाला तर लोकांचे बजेट ठिक होईल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटरचा बस प्रवास सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याच्या दृष्टीने ‘पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटर’चा प्रवास ही योजना पीएमपीकडून हाती घेण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा मध्यभाग निश्चित करून नऊ मार्गावर पाच किलोमीटर लांबीच्या परिघात प्रवाशांना पाच रुपयात प्रवास करता येणार आहे. या योजनेला ‘अटल प्रवासी योजना’ असे नाव देण्यात आले असून याच उद्घाटन आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोन्ही महापालिकेच्या महापौर, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.शहरातील छोट्या छोट्या गल्ल्यांमध्येही कनेक्ट करणारी सेवा पीएमपीएम उपलब्ध करून देत आहे. आणि एक अॅप तयार करत आहे ज्याच्यात बसेस वेळापत्रकात असणार आहे. हे सगळंच अभिनंदनीय आहे. लोकांना उपयोगी पडणारी योजना असून याचा फायदा पुणेकरांना होणार आहे, अशी माहितीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. शहरातील कमी अंतराच्या मार्गावर प्रवासासाठी पीएमपीकडून फिडर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रवाशांना पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास पाच रुपयांमध्ये करता येणार आहे. दर पाच मिनिटाला एक अशी या गाड्यांची वारंवारिता असेल. स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, पूलगेट, पुणे रेल्वे स्थानक, महापालिका भवन या महत्त्वाच्या स्थानकासह उपनगरातील कात्रज, हडपसर, निगडी, कोथरूड, भोसरीसह एकूण १२ आगारातून ५३ मार्गावर फिडर सेवा दिली जाणार आहे. या सेवेसाठी मध्यम आकाराच्या (मिडी बस) गाड्यांचा वापर केला जाईल. एकूण १८० गाड्या या मार्गावर धावणार आहेत. त्यासाठी कमी उत्पन्न असलेल्या मार्गावरील गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे प्रवाशांची कोणतीही अडचण होणार नाही, याची ही खबरदारी पीएमपीएम प्रशासनाने घेतली आहे.