पुणे - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत महाविकास सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली. सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतरही त्यांनी केलेली ठोस कामे अद्यापही दिसत नाहीत, असे सांगत महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय असल्याची टीका फडणवीस यांनी केली. तसेच पर्यायी सरकार देण्यास आम्ही सक्षम असल्याचेही फडणवीस म्हणाले.
- सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत -
फडणवीस म्हणाले, या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण केलेले नाहीत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीनंतर घोषित केलेली नुकसानभरपाई अद्यापही नागरिकांना मिळाली नाही. विजेच्या सवलतीच्या संदर्भात जे घुमजाव सरकारने केले ते पाहता सरकारमध्ये समन्वय नाही. केवळ कामांना स्थगिती देणे इतकीच कामे या सरकारच्या काळात सुरू आहे. त्यामुळे अपेक्षाभंग झालेली जनता पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करेल. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सक्षम आहोत, हे अनैसर्गिक सरकार जास्त वेळ चालणार नाही, हे सरकार जेव्हा ते पडेल तेव्हा आम्ही सक्षम सरकार देऊ.
- शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही
शिवसेनेच्या एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानंतर त्याच्यावर महाराष्ट्र द्रोही असल्याचा ठपका ठेवला जातो. आपल्या अंगावर आले की पुढच्याला महाराष्ट्र द्रोही म्हणायचे ही शिवसेनेची भूमिका योग्य नाही. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या सर्वाधिक गुजरातपेक्षाही जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. त्यामुळे शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजून घेतले पाहिजे.
- प्रताप सरनाईक यांनी स्वतःहून तपास यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांकडे गैर मालमत्ता असल्याचा आरोप केला होते. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, संजय राऊत यादी असल्याचा फक्त आरोप करतात. परंतु, प्रत्यक्षात ती ईडीला पाठवत नाहीत. ठोस पुरावा असल्यामुळेच ईडीने प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे सरनाईक यांनी क्वारंटाईन न होता स्वतःहून पुढे जाऊन तपास यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे.
- जयंत पाटील यांनी पराभव मान्य केला