पुणे -पुण्यात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील माहिती घेण्यासाठी भाजपा नेत्या चित्रा वाघ आज पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना पुणे पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. परंतू पूजा चव्हाण प्रकरणातही पोलिसांनी असा तपास केला असता तर, असा सवालही त्यांनी पोलिसांना विचारला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
'जास्तीत जास्त शिक्षा झाल्यास जरब बसेल'
चित्रा वाघ म्हणाल्या, की सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत त्यातील सर्व आरोपींना अटक केली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. परंतु अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आजवर अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्या त्यातील महिलांना अजूनही न्याय मिळाला नाही. अशा प्रकारच्या घटनेतील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाल्यास आरोपींवर जरब बसेल. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालले पाहिजेत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.