पुणे- कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. याचा निषेध करण्यासाठी 22 मे रोजी 'मेरा आंगन मेरा रणांगण' 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
'कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी'
विरोधी पक्ष म्हणून आम्ही आतापर्यंत सहकार्याची भूमिका ठेवली. आम्हालाही आमची भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे येत्या 22 मे रोजी 'मेरा आंगण मेरा रणांगण' महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, की महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण 9 मार्चला सापडला, त्याच दिवशी केरळातही पहिला रुग्ण सापडला. सद्यस्थितीत 70 दिवसानंतर केरळातील कोरोनाची रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे गेली नाही. याच 70 दिवसात महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 40 हजाराच्या दिशेने निघाली. केरळात आतापर्यंत फक्त 12 जणांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या बाराशेवर गेल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
संकट खूप मोठे आहे, म्हणून विरोधी पक्ष म्हणून आम्ही आतापर्यंत सहकार्याची भूमिका ठेवली. पण आता सर्वसामान्य जनता देखील त्यांच्या मनातील राग लपवू शकणार नाहीत. विरोधी पक्ष म्हणून आम्हालाही आमची भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील सर्व केंद्रात तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. येत्या 22 मे रोजी 'मेरा आंगन मेरा रणांगण' महाराष्ट्र बचाव अशाप्रकारची भूमिका घेऊन भाजपतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते 12 या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील लाखो लोकांनी आपल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून निषेध व्यक्त करणारे काळे बोर्ड, काळ्या रिबीन, काळे मास्क, काळे शर्ट घेऊन निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. केंद्र सरकार काय देते, अशी विचारणा करत असताना राज्य सरकारने अद्यापही स्वतःचे पॅकेज घोषित केले नाही. हातावर पोट असणाऱ्या माणसाला महाराष्ट्र सरकारने पॅकेज दिले पाहिजे. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. मुंबईतील माणसाला कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारावर उपचार मिळत नाहीत असेही ते म्हणाले.