पुणे -राज्यातील राष्ट्रपती राजवट, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या सरकारची स्थापना तसेच सत्ता स्थापनेसाठी कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, या विषयावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी पुण्यात झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा... 'बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजप-शिवसेनेची व्हिडिओबाजी; सेनेला शहाणपण शिकवण्याची गरज नाही'
राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी वेळ आलीच तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्ता स्थापन करेल का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता, आम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, ज्यांना आम्ही विचाराने पराभूत केले. जे आमच्यापेक्षा वैचारिक दृष्ट्या भिन्न विचाराचे आहेत. त्यामुळे त्यांच्या किती जवळ जायचे? याला काही मर्यादा असू शकतात, असे जयंत पाटील म्हणाले. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची, विधानसभा सदस्यांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची जी अपेक्षा आहे तीच भूमिका पक्षाचीही असेल. तरीही पक्षप्रमुख म्हणून शरद पवारच यावर योग्य निर्णय घेतील, असे सांगत जयंत पाटील अप्रत्यक्षपणे भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती होणार नसल्याचे सांगितले.
हेही वाचा... शिवसेना एनडीएतून बाहेर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी केले जाहीर
पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी मोदीबागेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची रविवारी बैठक झाली. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला जयंत पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.