महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्वरभास्कराला ‘अभिवादन’; भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास होणार सुरुवात - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी ४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाने ‘अभिवादन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी

By

Published : Jan 28, 2021, 1:59 AM IST

पुणे - भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी ४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाने ‘अभिवादन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ६ आणि ७ फेब्रुवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. कोरोना काळातील मरगळ झटकत संगीतप्रेमींना व विशेषतः पंडितजींच्या चाहत्यांसाठी हा सोहळा म्हणजे पर्वणी ठरणार आहे.

दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सांगीतिक मैफीलींबरोबर भीमसेनजींच्या आठवणींना उजाळादेखील देण्यात येणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. हा कार्यक्रम तीन सत्रात होणार असून शनिवार ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यानंतर सांगीतिक कार्यक्रमाला प्रारंभ होईल.

दुसरे सत्र रविवारी ७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते १२ या वेळात रंगणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या सत्रात संगीत क्षेत्राबाहेरील क्षेत्रातील प्रथितयश मान्यवर पंडितजींविषयी आठवणींना उजाळा देणार आहेत. यात ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी लेखक, दिग्दर्शक व गीतकार श्रीरंग गोडबोले संवाद साधणार आहेत. प्रत्येक सत्रातील गायन-वादनाच्या कार्यक्रमांमध्ये, ज्येष्ठ गायक पं. अजॉय चक्रवर्ती, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पंडिता डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ सतार वादक उस्ताद शाहीद परवेज, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, पंडितजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले त्यांचे शिष्य पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी तसेच पंडितजींचा नातू विराज जोशी आदी कलाकार रसिकांपुढे आपली कला सादर करतील. कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असेल परंतु कार्यक्रमासाठी मोफत प्रवेशिका घेणे अनिवार्य असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details