पुणे -शहरात आपले छंद जोपासण्यासाठी वाटेल ते कष्ट करणारे अनेक लोक असतात. अशाच अवलिया पुणेकरांपैकी नंदू कुलकर्णी आहेत. कुलकर्णी पक्षांवर नितांत प्रेम करतात. त्यांनी पक्षांसाठी सुंदर बाग तयार केली आहे. गेल्या तीस वर्षापासून ते पक्षांची मैफल भरवतात. सध्या सुरू असलेल्या पक्षी सप्ताहानिमित्त ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट...
ध्येयाने पछाडलेलेपंचाहत्तरीचेव्यक्तिमत्त्व
सध्या वयाच्या पंचाहत्तरीत असलेले नंदू कुलकर्णी गेली 30 ते 40 वर्ष बाग काम, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग संवर्धनाचा वसा जोपासत आहेत. कुलकर्णी यांनी आपल्या घराच्या गच्चीवर तब्बल 500 वेगवेगळी झाडे लावली आहेत. त्यात फुलांची झाडे, फळ झाडे, वेली आहेत. कुठल्याही रासायनिक फवारणीशिवाय नैसर्गिक पद्धतीने नंदू कुलकर्णी यांनी बाग जपली आहेत.
40 पेक्षा जास्त प्रकारच्या पक्ष्यांची रोजची हजेरी-
झाडांना रोज पहाटे पाच वाजता उठून ते पाणी घालतात. त्यांच्या या बागेत पहाटे विविध रंगी, विविध आकाराच्या आणि जातीच्या पक्ष्यांची मैफल भरलेली असते. सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने कुलकर्णी यांच्या दिवसाला सुरुवात होते. साळुंकी, दयाळ, टोपीवाला, लाल गाल्या बुलबुल, लालबुड्या बुलबुल, चष्मेवाला, कोतवाल, शिंजीर, शिंपी, राखी वटवट्या, तांबट, हळद्या, वेडा राघू, जांभळा सूर्यपक्षी, असे सुमारे ४० विविध प्रकारचे पक्षी या बागेत येतात.