मुंबई - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी देशातील पहिल्या मुलीच्या शाळेची सुरुवात पुण्यातील ज्या भिडे वाड्यात केली, त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठीचे सर्व अडथळे लवकरच दूर होणार आहेत. भिडे वाडा हे राष्ट्रीय स्मारक करण्यासंदर्भात मंत्रालयात एक बैठक घेऊन न्यायालयात गेलेल्या गाळेधारकांचे योग्य पुनर्वसन करण्याबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.
शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक कधी करणार, यासंदर्भात तारांकीत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाश शिंदे म्हणाले, १८५१ मध्ये देशातली मुलींची पहिली शाळा भिडे वाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली. त्यामुळे भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी शासनाची इच्छा आहे. तिथे ९ गाळेधारक आहेत. काही गाळेधारक न्यायालयात गेल आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. २००६ मध्ये पुणे महापालिकेने भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे, असा ठराव केला. तसेच १ कोटी ४० लाख निधीची तरतूदसुद्धा केली आहे. गाळेधारकांशी न्यायालयाबाहेर चर्चा केली जाईल. पुणे महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा झाली आहे. या संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन युद्धपातळीवर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच भिडेवाडा इमारतीस राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी पुणे महापालिकेने हेरिटेज वास्तुंची ग्रेड यादी तयार केली असून त्यात भिडे वाड्याचा समावेश असल्याची माहितीही शिंदे यांनी आपल्या उत्तरात दिली. भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाच्या या प्रश्नावरील चर्चेत भाई गिरकर, विद्या चव्हाण, जोगेंद्र कवाडे यांनी भाग घेतला.