पुणे - आरोग्यविषयक प्रश्नांवर जनजागृती करण्यात आघाडीवर असलेली युवा नृत्य कलावंत आणि चित्रपट अभिनेत्री आयली घिया हिची केंद्र सरकारच्यावतीने फिट इंडिया अंबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून केवळ तीन जणांची फिट इंडिया अंतर्गत निवड झाली, असून पुण्यातून निवड झालेली आयली ही एकमेव फिट इंडिया अँबॅसेडर आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे फिट इंडिया अँबॅसेडर म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तिमध्ये ती सर्वात तरूण आहे.
पुण्यातून निवड होण्याचा पहिला मान
केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिट इंडिया व स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई) वतीने देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून काही तरुण तरुणींची निवड केली आहे. ही निवड एका वर्षासाठी आहे. आयली घिया हिला फिट इंडिया अँबॅसेडर म्हणून निवड झाल्याचे पत्र २५ फेब्रुवारी २०२१ रोजी केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहे. पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. कविता आणि डॉ. प्रमोद घिया यांची आयली ही कन्या आहे.
आयली घियाची 'फिट इंडिया अँबॅसेडर' म्हणून निवड सोशल मीडियावर जनी टूवर्डस् हेल्दी लाईफ' हा उपक्रम सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी फिट इंडिया मोहिमेची घोषणा केली. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने ही संकल्पना केंद्र सरकारमार्फत कार्यान्वित करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनात खेळ आणि व्यायामाचा अंतर्भाव करून प्रत्येक नागरिकाने स्वतःला आरोग्यसंपन्न ठेवावे हा या मोहिमेमागील उद्देश आहे. नृत्य आणि अभिनय क्षेत्रात ओळखली जाणारी आयली हिने बॉलीवूड चित्रपटासह मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. काही वर्षांपासून ती युवा पिढीसाठी फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणून काम करीत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ती आहार आणि व्यायामाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत असून स्वास्थ्यविषयक जनजागृती करीत आहे. कोरोना काळात आयली हिने सोशल मीडियावर जनी टूवर्डस् हेल्दी लाईफ' हा उपक्रम सुरू केला. त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांबरोबर चर्चा करून जनसामान्यांच्या आरोग्यविषयक विविध समस्यांचे निराकरण करण्याचा तिने प्रयत्न केला. जागतिक आरोग्य दिनानिमित्त ऑनलाईन योगा वर्गाचे आयोजनही आयली हिने केले होते. त्यात अनेक देशातील नागरिकांचा समावेश होता. 'योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व' या विषयावर तज्ज्ञांसह तिने चर्चेत सहभाग घेतला होता. विविध आरोग्यविषयक सेवा आयली हिने नि:शुल्क देऊन सामाजिक बांधिलकीची जपणूकही केली आहे.
'फिट इंडिया अँबॅसेडर' म्हणून निवड येणाऱ्या वर्षात अनेक उपक्रम राबविणार
सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी येणाऱ्या वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.योगा, तसेच फिटनेस,आणि नृत्याद्वारे फिटनेससाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहे, असंही यावेळी आयली हिने सांगितलं.