नांदेड/पुणे -आपल्या घरात लग्न म्हटल्यावर प्रत्येक जण त्यासाठी उत्सुक असतो. आपल्या मुलाचे अथवा मुलीचं लग्न धुमधडाक्यात व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र याला पुण्यातील एका डॉक्टरांनी बगल दिली आहे. मुलीच्या लग्नाचा खर्च टाळत त्याच पैशातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला हक्काचं घर बांधून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
पुण्यातील भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी आपली कन्या गायत्रीच्या विवाहानिमित्त नांदेड येथील अर्धापूरमधील लक्ष्मी साखरे यांना स्वत:चे घर बांधून दिले आहे. साध्या पद्धतीने विवाह करुन कौटुंबिक सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याच्या प्रयत्न भोई यांनी त्यांच्या या मदतीतून केला आहे.
डॉ. मिलिंद भोई यांची मुलगी गायत्री भोई हिचा विवाह नुकताच 22 जानेवारीला हृषिकेश गोसावी यांच्याशी झाला आहे. गायत्री आणि हृषिकेश यांच्या विवाहानिमित्त भोई प्रतिष्ठानतर्फे लक्ष्मी साखरे यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. गोसावी कुटुंब अर्धापूर येथे शेतातील झोपडीतून स्वत:च्या नवीन घरात राहायला गेल्यावर या परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
पुण्याचे डॉ.मिलिंद भोई यांनी जपलं सामाजिक बांधिलकीच नातं -
विवाह सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या आप्तस्वकीय, मित्र परिवार यांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते. कपडे,आहेर, फोटो, यांसह विविध वस्तुंचा समावेश असतो. आपल्या अन्नदात्यां विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी भगिनीला विवाह निमित्ताने सुंदर असे घर बांधून देण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प लवकरच पूर्ण होणार असून लवकरच नवदाम्पत्याच्या उपस्थित गृहप्रवेश सोहळा पूढील महिन्यात होणार आहे. प्रत्येकांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण....हा सोहळा भव्यदिव्य हावा असे सर्वांना वाटते....सोहळ्यात, मोजमजा, विविध अन्न पदार्थ, मोठा मंडप, एखाद्या ऐतिहासिक स्थळाचा देखावा उभा करणे, हाजारों पाहूणे मित्रमंडळींची उपस्थित यांवर भर दिला जातो. पण या सर्व गोष्टींना फाटा देत आपल्या अन्नदात्यां विषयी कृतज्ञता म्हणून आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात अनावश्यक खर्चाला फाटा देत पुण्यातील डॉ मिलिंद भोई यांनी आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील महिलेला आरसीसीचे पक्के असे घर बांधून देण्याचा संकल्प केला. हा संकल्प लवकरच पूर्ण होणार असून लवकरच नवदाम्पत्याच्या उपस्थित गृहप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. शहरातील कृष्णा नगर परिसरात घर बांधण्यात येत असून हे बांधकाम आता पूर्ण झाले आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे पुण्यजागर प्रकल्प
अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पुण्यजागर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच पुण्यातील विविध कुटुंबात दहा दिवस या शेतकरी कुटुंबातील सदस्य दिवाळी साजरी करण्यात येते. तसेच हे कुटुंब सुशिक्षित व आर्थिक स्वालंबी होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
लक्ष्मी साखरे यांच्या घराचे स्वप्न साकार -
भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मिलिंद भोई यांच्या गायत्री या लाडक्या लेकीच्या लग्नाची एकीकडे तयारी सुरू झाली, तर दुसरीकडे अर्धापूर शहरातील लक्ष्मी साखरे यांच्या घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करून बांधकाम अंतिम टप्प्यात असे जाईल याची काळजी घेतली जात होती. शहरातील अहिल्यादेवी नगरात राहणाऱ्या लक्ष्मी साखरे यांच्या पतीने नापिकी व कर्ज बाजारीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांना दोन छोट्या मुली व एक मुलगा आहे. अत्यल्प शेती, घरात कर्ता पुरुष नाही, अडचणींचा डोंगर, पाल्यांचे शिक्षण आदी अडचणीतून हे कुटुंब मार्ग काढत असताना त्यांच्या मदतीला भोई प्रतिष्ठान धावून आले. डोक्यावर आपल्या हक्काची छत असावं हे प्रत्येकाचे स्वप्न...,पण हे स्वप्न साकार होतेच असे नाही. घरी कर्ता पुरुष नसला की आणखीन अवघड होते. या शेतकरी कुटुंबाला मायेचा ओलावा डॉ.मिलिंद भोई यांनी देवून लक्ष्मी साखरे यांच्या घराचे स्वप्न साकार केले आहे. डाॅ.मिलिंद भोई यांची मुलगी गायत्री हिचा विवाह सोहळा शनिवारी (दि.२२) पूण्यात ऋषिकेश गोसावी यांच्याशी संपन्न झाला. या नवदाम्पत्याच्या उपस्थित गृहप्रवेश सोहळा पूढील महिन्यात संपन्न होणार आहे. शहरातील कृष्णा नगर परिसरात हे घर बांधण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या बांधकामासाठी पूण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे गुणवंत विरकर, नागोराव भांगे, डॉ. वैभव पूरंदरे, सुधाकर टाक, दिलीप डाढाळे, दत्ता टोकलवाड, पुरभाजी कानोडे, अमृता इंदेवाड, राजु लोणे , शंकर ढगे, प्रल्हाद माटे, गजानन मेटकर, शेख जूबेर, उद्धव सरोदे, दिगांबर मोळके, जावेद मिस्त्री, आदींचे सहकार्य लाभत आहे .
अन्नदात्यां विषयी कृतज्ञता ठेवणें हे प्रत्येकाचे कर्तव्य- डॉ.मिलिंद भोई
आपल्या अन्नदात्यां विषयी कृतज्ञता ठेवणें हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शेतकरी आपल्या अन्नदाता.शेतकरी कुटुंबात अडचणी येतात. हा अडचणीत सापडलेला शेतकरी टोकाचा निर्णय घेतो. ही वेळ कोणत्याही कुटुंबावर येवू नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.एका सामाजिक जाणीवेतून हा संकल्प केला. तो पूर्ण होत आहे. विवाह सोहळ्यात आहेर न देता शैक्षणिक साहित्य द्यावे अशा भावना डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केल्या आहेत.