पुणे - संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा 'अटल संस्कृती गौरव पुरस्कार' या वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना दिला जाणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माशेलकर यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
अटल सांस्कृतिक गौरव पुरस्काराविषयी माहिती देताना महापौर मोहोळ पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष -पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष असून यापूर्वी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना अटल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. २५ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून पुरस्काराचे वित्तरण राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पुणेरी पगडी आणि गौरवनिधी असे आहे. कोथरूड मतदार संघाचे आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असणार आहेत. यावेळी खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर आदींची विशेष उपस्थिती असणार आहे.
गीत नया गाता हूँ, या दृक-श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन -पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित गीत नया गाता हूँ' हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संवाद पुणेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर अटलजींच्या रचना सादर करणार असून अभिनेत्री भार्गवी चिरमुले नृत्य सादर करणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन सुनील महाजन यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे.
नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कार्यक्रम -संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा 'अटल संस्कृती गौरव पुरस्कार' कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून होणार आहे, अशी माहितीही यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.