पुणे -'शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने संभ्रमाची अवस्था निर्माण केली आहे, असा आमचा थेट आरोप आहे. राज्य सरकारने कोणालाही विश्वासात न घेता परस्पर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सांगितलेल्या वेळेत शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे अनेक महापालिकांनी सांगितले. यानंतर सरकारने पुन्हा स्थानिक प्रशासन यासंबधीचे निर्णय घेईल, असे सांगितले. शिक्षणाधिकारी, शिक्षक संघटना, पालक संघटना, जिल्हाधिकारी कोणाशीच चर्चा नाही. हे सरकार आहे की छळवणुकीचे केंद्र?' असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली.
सरकार अकार्यकक्षम
'पदवीधर मतदार संघामध्ये भाजपला मतदान करा. याआधी चंद्रकांत पाटील यांनी काम केले आहे. शिक्षकांसाठी जुन्या नियमांनुसार पेन्शन द्यावी, ही जुनी मागणी आहे. आम्ही आमच्याच कळात ही मागणी पूर्ण केली. हे सरकार अकार्यकक्षम सरकार आहे. त्यांना शेतकऱ्यांना पॅकेज देण्यावर निर्णय घेतलेला नाही. ठाकरे सरकार पळपुटे सरकार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला हे सरकार सुप्रीम कोर्टात बोट दाखवत आहे. बदल्यांचा विषय आला की दलालाकडे बोट दाखवतात. कोरोना काळात महिला अत्याचारात वाढ झाली. वर्षभरात ठाकरे सरकारने महाराष्ट्राची दयनीय अवस्था केली आहे,' असे शेलार म्हणाले.