पुणे -राज्य शासनापासून ते नगरपालिकेपर्यंत आणि पोलिस दलापासून एसटी महामंडळापर्यंत सर्वांनी ‘सिटिझन पोर्टल’ कार्यान्वित केली आहेत. मात्र, या पोर्टलवर केलेल्या तक्रारी कडे पोलीस पाठ करत असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. पोलिस दलाच्या पोर्टलवर पुण्यातील 32 पोलिस ठाण्याअंतर्गत तब्बल 287 तक्रारींचा निपटारा झालेला नाही. दिवसेंदिवस हा आकडा वाढतो आहे. पुणे शहरात सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांनी दाखल केलेल्या ऑनलाइन (ई-तक्रारी) तक्रारी मोठ्या प्रमाणात पोलिस ठाणे दरबारी प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्व पोलिस ठाणेप्रमुख व सीसीटीएनएस नोडल अधिकारी यांना संबंधित तक्रारींची तत्काळ निर्गती करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काय आहे ई-तक्रार प्रणाली -
नागरिकांना येणाऱ्या अडचणी अगर तक्रारी घरबसल्या देता याव्यात यासाठी शासनाने पोलिस दलाचे स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. गेल्या वर्षी कार्यवाही सुरू झाली. या पोर्टलवर आलेली ऑनलाइन तक्रार मुख्यालयात असलेल्या स्वतंत्र कक्षातून संबंधित पोलिस ठाण्यास पाठविली जाते. त्याठिकाणी तक्रारीच्या निवारणाची जबाबदारी विशिष्ट कर्मचाऱ्यावर निश्चित केली जाते. त्या कर्मचाऱ्याला तक्रारीच्या अनुषंगाने अधिक माहिती घ्यायची असल्यास त्याला तक्रारदाराचा मोबाईल क्रमांक कळविला जातो. तक्रारीच्या कार्यवाहीची सद्य:स्थिती तक्रारदारास पोर्टलवर दिसते. शिवाय निवारण झाल्यानंतर अंतिम स्थिती तक्रारदारास ऑनलाइन कळविली जाते.