पुणे - संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 141 व्या दीक्षांत समारंभात पासिंग आऊट परेड झाल्यानंतर लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरावणे यांनी कॅडेट्सना संबोधित केले. तसेच पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तरे दिली. प्रबोधिनीमध्ये मुलींचे खुल्या मनाने आणि मानसन्मानाने स्वागत केले जाईल, असे ते म्हणाले. तसेच आज मी जिथं उभा आहे. तिथं चाळीस वर्षानंतर एक महिला असू शकते, असेही त्यांनी म्हटलं.
आज मी जिथं उभा आहे, तिथं चाळीस वर्षानंतर एक महिला असू शकते - लष्कर प्रमुख राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) द्वार मुलींसाठी खुले केलेले आहे. भारतीय सशस्त्र दल निष्पक्षता आणि व्यावसायिकतेसाठी जगभरात ओळखले जाते. त्यामुळे प्रबोधिनीमध्ये मुलींचे खुल्या मनाने आणि मानसन्मानाने स्वागत केले जाईल, हे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, असे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरावणे म्हणाले. तसेच आज मी जिथं उभा आहे. तिथं चाळीस वर्षानंतर एक महिला असू शकते, असं मत लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केलं.
आपल्या भाषणात लष्करप्रमुखांनी कॅडेट्सना आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञानाच्या समावेशच्या बाबतीत भारत कोणत्याही विकसनशील किंवा विकसित देशांच्या मागे नाही. गेल्या काही वर्षांमध्ये युद्धाचे स्वरूप बदलत चालले आहे. वर्षानुवर्ष तंत्रज्ञान त्याच्या पद्धतीमध्ये अधिकाधिक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शस्त्र दलामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यापर्यंत मी पुन्हा पुनराउच्चार करू इच्छितो की जगातील कोणत्याही विकसित किंवा विकसनशील देशांच्या तुलनेत आपण आता मागे नाही आहोत, असं देखील नरवणे यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी'च्या (एनडीए) परीक्षेस मुलीही पात्र असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने नुकताच दिला आहे. एनडीएत महिलांना स्थान नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत लष्कराला फटकारले होते. तसेच लष्कराचा हा निर्णय लैंगिक भेदभावावर आधारित असल्याचे नमूद केले होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला देखील याबाबतची नोटीस पाठवली होती. महिलांना एनडीएमध्ये सामील न करणं म्हणजे मूलभूत अधिकाऱ्यांचे हनन करणे होय, असे मत न्यायालयाने नोंदवले होते.