पुणे -शहर मनसेच्या अध्यक्षपदी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना दिले. दरम्यान मनसेचे सध्याचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमण्यात आले आहे.
पुणे महापालिका निवडणूक अवघ्या 1 वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने मनसेने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, वसंत मोरे यांच्या रुपाने एक आक्रमक चेहरा पुणे मनसेला मिळाला आहे. पुणे शहरातील मनसेची आगामी व्यूहरचना ठरवण्यासाठी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तसेच बुधवारी पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.