बारामती -कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या बातम्या व चर्चां वारंवार कानावर पडत होत्या. ऑक्सिजनचे महत्व लक्षात घेऊन अवघ्या अकरा वर्षाच्या शंभुराजने आपल्या घराच्या अंगणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या शेकडो झाडांची लागवड करून 'शंभूज' ऑक्सिजन पार्लरची निर्मिती केली आहे. याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष रिपोर्ट.
पाचवीतील विद्यार्थ्याने केली 'ऑक्सिजन पार्लरची' निर्मिती, बारामतीतील शंभुराजचे सर्वत्र कौतुक अशी केली ऑक्सिजन पार्लरची निर्मिती
बारामती येथील शंभूराज यशवंत जगदाळे असे या अकरा वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. इयत्ता पाचवीत शिकत असणाऱ्या शंभुराजने गेल्या दीड वर्षात अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन अभावी प्राण गमवावे लागल्याची चर्चा बातम्या व सोशल मीडियामधून ऐकल्या होत्या. त्यातूनच त्याला आपणाला लागणारा ऑक्सिजन आपणच का तयार करू नये, अशी कल्पना सुचली आणि ऑक्सिजन पार्लरची निर्मिती केली.
छोट्या जागेतूनही पुरेसा ऑक्सिजन मिळू शकतो -
शंभुराजने आपल्या घराजवळील उपलब्ध जागेत वातावरण शुद्ध करणारी व मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी वड, उंबर, तुळस, जरबेरा, नागफणी, ड्रेसीना, कोरफड आदी ऑक्सिजन देणारी व औषधी झाडे लावून ऑक्सिजन पार्लरची निर्मिती केली आहे. जागेची अडचण न सांगता प्रत्येक जण आपल्या बाल्कनी, टेरेस व इतर उपलब्ध जागेत झाडे लावून आपण पुरेसा ऑक्सिजन मिळवू शकतो, असे शंभुराज सांगतो.
भविष्यात शेती क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा मानस -
शंभूराज सध्या मायक्रोगेन या विषयावर काम करत आहे. अवघ्या अकरा वर्षांच्या शंभुराजला भविष्यात शेती क्षेत्रात भरीव कामगिरी करायची आहे. त्याची सुरुवात त्याने आतापासूनच सुरू केली आहे. त्याच्या कामाची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी त्याने ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना प्रेरणास्थानी ठेवून क्यूआर कोड बनविला आहे. या सर्व कामासाठी त्याला त्याची आई शुभांगी जगदाळे आणि वडील यशवंत जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. ऑक्सिजन कसा तयार होतो. आपल्याला ऑक्सिजनची निर्मिती कशी करता येईल याबद्दल शंभुराजने विचारले तेव्हा त्याला माहिती देऊन ऑक्सिजन देणारी झाडे उपलब्ध करून दिली. स्वतः शंभूराजने त्या झाडांची लागवड केली. ऑक्सिजन पार्लरची निर्मिती केली आहे, अशी माहिती आई शुभांगी जगदाळे यांनी दिली.
पुष्पगुच्छांना करा बाय बाय..
झाडांचे महत्त्व पटवून देताना शंभूराज सांगतो की, विविध कार्यक्रमात दिल्या जाणाऱ्या पुष्पगुच्छांना बाय बाय करा. ऑक्सिजन देणाऱ्या झाडांशिवाय पर्याय नाही. असा बहुमोल संदेश देतो.
हेही वाचा - कोरोनाचा धोका कायम; जुलैमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत घट नाही