पुणे -शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका प्रशासनाने शहरासाठी नवे प्रतिबंध जाहीर केले आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः प्रतिबंध करण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश काढले आहेत.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व हॉटेल, रेस्टोरंट, बार, फूडकोर्ट, सिनेमागृह त्यांच्या आसन क्षमतेच्या 50 % क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच अँपद्वारे किंवा हॉटेलमार्फत घरपोच सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहील. हॉटेल रेस्टोरंट यांना ग्राहकांच्या उपस्थितीबाबत दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. दर्शनी भागावर हॉटेलची एकूण आसन क्षमता आणि हॉटेलमध्ये उपस्थित ग्राहक यांची संख्या दर्शविणारे बोर्ड दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे.