पुणे- जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरणाचे पाणी कमी होऊ लागल्याने धरणाखाली गेलेले आंबेगाव गावठाण पुन्हा दिसू लागले आहे. त्यामुळे गावकर्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आंबेगाव गावातील प्रतिक्रिया देताना नागरिक जुने आंबेगाव गावठाण व येथील जलसमाधिस्त झालेले प्रसिध्द जैन मंदिर पूर्णपणे उघडे पडले आहे. तब्बल २० वर्ष पाण्याखाली राहूनही हे जैन मंदिर अजूनही सुस्थितीत असून मंदिरात आत-बाहेरून असलेली कलाकुसर, कोरीव काम व नक्षीकाम आजूनही जसेच्या तसे असलेले पाहायला मिळते. पाण्याखाली गेलेल्या आंबेगाव गावठाणातील घर व वाडे यांचे ढिगारे, पुर्वजांची थडगी, तेलाचे घाणे, मंदिर व जैन मंदिर पाहता त्याकाळचे महत्वाचे व्यापारी ठिकाण असलेले आंबेगाव किती समृद्ध होते, याचा आजही अंदाज येतो.
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डिंबा धरणाच्या कालव्यातुन पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला. यामुळे धरणाची पाणी पातळी खालावल्याने पाण्याखाली गेलेले गाव पुन्हा दिसु लागले आहे. आंबेगाव तालुक्यातील घोडनदी व गुंबरानदीच्या संगमावर पुर्वी आंबेगाव हे गाव वसलं होते. मात्र, १९७८ साली याच २ नद्यांवर डिंबा हा जलाशय उभा करण्यात आला.
आंबेगाव ३५ वर्षांपूर्वी उत्तम बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. या गावात तालुक्यातील अनेक गावाचे लोक येत होते. जुन्या पध्दतीच्या विटांमध्ये बांधलेल्या इमारती, विविध मंदिरे व चारही दिशांना पसरलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगानी हे गाव वैभवसंपन्न होते. गावाच्या किनाऱयावरुन वाहणाऱ्या घोड सरीता नदीमुळे गाव सुंदर दिसत होते.
आज दुष्काळाचे संकट आले असताना आंबेगावाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. नागरिकही आपल्या गावाचे जुने रुपडे पाहण्यासाठी येत आहेत. यावेळी येथे राहणारे ग्रामस्थ गावातील जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.