पुणे - पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटसंदर्भात अजित पवार यांनी आज मौन सोडले आहे. पुणे स्टेशनवर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दादा सकाळीच शहरात दाखल झाले. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पार्थ पवार यांनी कालच मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याचे संकेत दिले होते. याबाबत त्यांनी सलग तीन ट्विट करत आपली बाजू मांडली होती. यावर बोलताना 'मुलगा काय ट्विट करतो हे मी पाहत नसतो, मला तेवढेच उद्योग नाहीत,' असे अजित पवार म्हणाले. राज्याच्या विविध जबाबदाऱ्या मला बघायच्या असतात, असे सांगून त्यांनी या प्रश्नाला पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला.
'मुलगा काय ट्विट करतो हे मी पाहत नसतो...मला तेवढेच उद्योग नाहीत! - ajit pawar at gandhi statue
पुणे स्टेशनवर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळीच शहरात दाखल झाले. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच पार्थ पवारच्या ट्विट संदर्भात त्यांनी भाष्य केले.

त्याला ट्विट करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे, असेही दादा यावेळी म्हणाले. प्रत्येकाने काय ट्विट करावं हा त्याचा अधिकार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाविषयी आधीच भूमिका जाहीर केल्याची आठवण त्यांनी करून दिली.
उत्तरप्रदेशमध्ये युवतीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेबाबत बोलताना हाथरस सारख्या घटना घडू नये यासाठी कडक कायदे करण्याची गरज दादांनी बोलून दाखवली. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी या प्रकारचे कृत्या करणाऱ्यांना कडक शिक्षेची मागणी केली. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याचा अधिकार सर्व पक्षीयांना असल्याचे त्यांनी सांगितले.