पुणे -पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( PDCC Bank Meeting In Pune ) संचालकपदाच्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्याकरीता आज पुण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही ( Ajit Pawar ) उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ' मी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर ( Ajit Pawar speak about PDCC Bank Board of Director Nomination ) जाणार नव्हतो. मात्र, काही लोकांनी मला म्हटले की, तुम्ही संचालक मंडळात नाही गेले, तर मोठी समस्या होऊ शकते, त्यामुळे मी माझा अर्ज भरला', तसेच दिलीप वळसे पाटील यांची देखील तयारी नव्हती, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
काय म्हणाले अजित पवार -
काही कार्यकर्त्यांच्या मनात येईल की, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं, दिलीप वळसे पाटील यांना मंत्री केलं तरी यांंची बँकेतील हौस का जात नाही, असा प्रश्न 100 टक्के तुमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल. पण मी यावेळेस बँकेच्या संचालक मंडळात जाणार नव्हतो. परंतु काही लोक बोलले की दादा तुम्ही गेले नाही तर गडबड होईल, म्हणून मी माझा अर्ज भरला, अन्यथा मी यंदा जिल्हा बॅंकेची निवडणूक लढणार नव्हतो, असे अजित पवार म्हणाले.
'बंधने घालायला आम्हालाही चांगलं वाटत नाही' -
सध्या कोरोनाच संकट वाढत आहे. अनेक लोकांना याची लागण आहे. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांनाच याची बाधा झाली आहे. तज्ज्ञांच्या मते जानेवारी अखेर आणि फेब्रुवारीमध्ये आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. अनेक निर्णय घेण्यात आले आहे. बूस्टर डोस तसेच मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात आल आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसेच 31 डिसेंबरला बाहेर जाऊन नवीन वर्षाचे स्वागत अनेक लोक करत असतात, त्याच पद्धतीने तरुण-तरुणींना याचा मोठ्या प्रमाणात आकर्षण असते. कोरोनाच सावट पाहता नवीन वर्षाचे स्वागत घरातच राहून करावे. बंधने घालायला आम्हाला चांगले वाटत नाही. परंतु परिस्थिती अशी उधभवल्याने काही निर्णय घ्यावे लागतात, असेही ते म्हणाले.
'आम्ही फक्त घोषणा करत नाही, तर कृती करून दाखवतो' -
1 जानेवारीला कोरेगाव भीमाला अभिवादन करण्यासाठी मी जाणार आहे. कोरेगाव भीमा इथं कायम स्वरूपी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच पद्धतीने वढू आणि तुळापूर इथं स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा स्मारक उभे करण्यात येणार आहे. कृषी भवन तसेच सारथीची मुख्य इमारत पुण्यात बांधण्यात येणार आहे. अनेक महत्वाचे निर्णय महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. आम्ही फक्त घोषणा करत नाही तर कृती करून दाखवतो, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
हेही वाचा -Ajit Pawar on Sharad Pawar Statement : 'शपथविधीवर जेव्हा मला वाटेल तेव्हा मी बोलेल, तो माझा अधिकार आहे'