पुणे -लसीकरणासारख्या विषयात राजकारण, आरोप-प्रत्यारोप व्हायला नको, असे स्पष्ट मत पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. या बैठकीनंतर पालकमंत्री माध्यमांशी बोलत होते. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरदेखील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यामध्ये लसीकरणाचे दिवसाला 1 लाख लसीकरण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये 85 हजारापर्यंत लसीकरण्याचे करण्याचे लक्ष गाठले गेले होते. पण, त्यानंतर लस कमी पडल्या आहेत. आवश्यक तेवढ्या लस पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी सांगितल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
हेही वाचा-Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू, जाणून घ्या ताजे अपडेटस्...
व्हेंटिलेटर आणि बेड वाढविणार-
पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा दररोज वाढणारा आकडा पाहता व्हेंटिलेटर, बेड, ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजनचा पुरवठा या बाबींना जास्त प्राधान्य द्यावे लागणार आहे. अशा प्रकारचे नियोजन करण्याचे दोन्ही महापालिका जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आल्याची माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन्ही जम्बो हॉस्पिटल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू कसे होतील ते पाहणार असल्याचेदेखील अजित पवार म्हणाले. ससून हॉस्पिटलमध्ये पाचशे बेडच्या सुविधा निर्माण करणार असल्याची त्यांनी माहिती दिली.