पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत वाढत जाणारे कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूदर पाहता या दोन्ही ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुणे येथे दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर, खासदार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा - अजित पवार - पुणे
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कार्यवाहीबाबत माहिती जाणून घेत पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कडक धोरण अवलंबवावे, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कार्यवाहीबाबत माहिती उपमुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कडक धोरण अवलंबवावे. त्यासाठी आठ दिवस कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील, असे अजित पवार म्हणाले.
कोल्हापूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आलेल्या ॲपच्या धर्तीवर पुण्यातही असा उपक्रम राबवावा. पोलिसांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाईल व्हॅनद्वारे तपासणीवर भर द्यावा. तसेच पोलिसांना एन-95 मास्क व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन द्यावीत. शहर आणि ग्रामीण भागातील मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावेत. यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. रेशन दुकानांव्दारे धान्य वितरण सुयोग्य व सुनियोजीत करण्यात यावे. एक व्यक्तीही अन्नधान्यापासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. अशा सूचना उपमख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.