पुणे - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कोश्यारी यांना अजित पवारांनी टोला लगावला आहे. महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने तारतम्य बाळगून वक्तव्य करायला हवीत. अनेकदा वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशी वक्तव्य बरेच जण करतात, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशी वक्तव्य -अजित पवार म्हणाले की, ते राज्यपाल आहेत. भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. या पदावर असताना त्यांनी नागरिकांच्या भावना दुखवणारी वक्तव्य केली आहेत. त्यांनी त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. वक्तव्य मागे घेतले, अस आपण पाहिलं आहे. पुढे ते म्हणाले की, मला इंद्राजींच्या काळापासून वेगवेगळे पंतप्रधान पाहायला मिळाले. बरेच जण वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. पण ती इतरांनी केल्यानंतर त्याची दखल घेतली जात नाही.
आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे -एखाद्या जबाबदर मान्यवराने तसे वक्तव्य केले, तर त्याची नोंद घेतली जाते. म्हणून महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने सगळ्या गोष्टींच तारतम्य बाळगूनच वक्तव्य केली पाहिजेत, असे अजित पवार म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, मावळमध्ये 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केला. या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा घटना कोणाच्या ही काळात घडू नयेत. कायद्यात सुधारणा करून कायदा कडक केला पाहिजे. समाजात भीती निर्माण व्हायला हवी, असे कृत्य करण्याचे धाडस कोणी केलं नाही पाहिजे. जगातील काही देशात असे अमानुष कृत्य केल्यास कठोर शिक्षा दिली जाते. असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.