पुणे -अग्निपथ योजनेच्या ( Agneepath Scheme ) विरोधात देशभरात उद्रेक पाहावयास मिळत आहे. ठिकठिकाणी आंदोलकांकडून जाळपोळ, तोडफोड व दगडफेक करून तरुणांकडून उग्रस्वरूपात आंदोलने सुरु आहेत. प्रामुख्याने रेल्वे स्थानकांना आंदोलकांकडून टार्गेट करण्यात येत आहे. आज ( शनिवार, 18 जून ) पुण्यात अग्निपथ योजना आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील ईडी कारवाईचा ( Rahul Gandhi ED Inquiry ) निषेध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. भाजपाच्या शहर कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं ( Youth Congress Protest Front Bjp Office In Pune ) आहे.
काँग्रसने कार्यालयासमोर आंदोलन केल्याने भाजपाचे कार्यकर्तेही यावेळी आक्रमक झाले. युवक काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी अखेर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.