मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या सहीत आमदारकीचा देखील राजीनामा दिल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही अनिल वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या कामांबाबत संतोष व्यक्त केला आहे. तसेच या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी दाखवलेल्या विश्वासाला बाबत त्यांचेही आभार मानले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांचे निवेदन -माझा अडीच वर्षांचा मंत्री म्हणून कार्यकाळ हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या दृष्टीने तरी चांगला गेला. खूप चांगले निर्णय घेता आले आहेत. लोकोपयोगी कामे करता आली. मंत्री म्हणून काम करत असताना या अडीच वर्षांत गृहनिर्माण विभागाचे माझे पहिले सचिव संजीव कुमार, त्यानंतरचे गृहनिर्माण सचिव श्रीनिवासन आणि आत्ताचे सचिव मिलिंद म्हैस्कर त्याचबरोबर म्हाडाचे सचिव डिग्गीकर, म्हाडाचे मुंबई विभागाचे मुख्य अधिकारी म्हसे, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी सतिश लोखंडे, रिपेअर बोर्डाचे अधिकारी डोंगरे यांचे माझ्या सर्व निर्णयांमध्ये अभूतपूर्व योगदान होते. माझे यश मोजले तर त्यामध्ये माझ स्वत:च योगदान 1 टक्का इतकेच आहे. बाकी या सगळ्या अधिका-यांचे योगदान आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांचे योगदान हे 99 टक्के आहे.
मंत्री पदाची जबाबदारी असताना अधिका-यांच्या सहका-याशिवाय व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय काम करणे हे निव्वळ अशक्य असतं. त्यांचा अनुभव, त्यांचे ज्ञान हे वेळोवेळी उपयोगी पडले. त्यामुळेच जे काही निर्णय घेता आले, ते योग्यरितीने पुढे नेण्यात मी यशस्वी झालो आहे.