पुणे -मी एका निवृत्त न्यायाधीशांबरोबर बसलो होतो. तेव्हा ते म्हणाले की, आमच्या काळात आम्ही अडाणी होतो पण आमचा राज्यकर्ता हा शिकलेला होता त्यामुळे आम्ही विचार केला नाही तरी आम्ही सुरक्षित होतो. पण आत्ता दुर्दैव असं आहे की, लोक हुशार झाले आहेत आणि राज्यकर्ते गाढव झाले आहेत.आता ते हिताचं बघतच नाहीत म्हणून मी म्हणतोय की इथला आमदार हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे आपण लक्ष द्या, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.
पुण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे गरीब मराठा समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र कुंजीर आदि मान्यवर उपस्थित होते.
गरीब मराठा समाज संवाद मेळाव्यात बोलताना प्रकाश आंबेडकर 169 कुटुंबातच सत्ता मर्यादित - सत्ता ही माझी थेअरी आहे. 169 कुटुंबे अगोदर होती आणि आत्ता 10 कुटुंबे त्याच्यात नात्या गोत्याच्या माध्यमातून वाढलेली आहे. यांच्यापोटीच सत्ता मर्यादित आहे. हे चक्रव्युह तोडणे आपल्याच हातात आहे आणि ते आपण तोडावं. हे चक्रव्यूह तोडल्याशिवाय कितीही आंदोलने केली तरीही ती यशस्वी होणार नाहीत. या चक्रव्युहातून आपण बाहेर पडलो की, सगळे प्रश्न आपल्याला सोडवलेले दिसतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सरकारने कोरोनाच्या नावाने फक्त लोकांना घाबरलं -
पूर्वी आजार होत होते तेव्हा त्या व्यक्तीला सात दिवस कोंडून ठेवलं जातं होत. आता त्याला नवीन क्वारंटाईन हा शब्द आला आहे. आत्ता सरकारने थेट वैकुंठाचा रस्ता दाखवला आणि नात्यांना नात्यापासून दूर केले. कोरोनाने काहीही बदल होत नाहीयेत, अशी टिकाही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
गरीब मराठा सत्तेत येत नाही, तोपर्यंत बदलाची अपेक्षा नाही -
जोपर्यंत गरीब मराठा सत्तेत येत नाही, तोपर्यंत बदलाची अपेक्षा करू नये. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो गरीब मराठा मेळावा घेण्याची हिम्मत दाखवली आहे, त्याबाबत मी अभिनंदन व्यक्त करतो. आज सत्तेत असलेला प्रस्तापित मराठा नेता गरीब मराठ्यांशी लग्न करत नाहीये. आज सामाजिक बदल झाला पाहिजे, पण तो होत नाहीये, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दुर्दैवाने राज्यकर्त्यांनी नियोजन केलं नाही -
मी कॉलेजला असताना आरक्षणाचा मुद्दा कधीच चर्चिला गेला नाही. कोण कुठं शिक्षणाला जाणार याच त्यावेळी नियोजन करण्यात आलं होतं. तेव्हा आरक्षणावरून भांडणं कधीच झाली नाहीत. आज भांडणं का होत आहेत तर लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढली त्याप्रमाणे विद्यार्थी संख्याही वाढत गेली आणि आज दुर्दैवाने त्यानुसार राज्यकर्त्यांनी नियोजनच केलेलं नाही, अशी टीकाही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली.